आंबा हा विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे झाड आणि फळ आहे. या फळाला महाराष्ट्रात 'कोकणचा राजा' म्हणतात. तर इतर भाषांत अरबी मंगा, आसामी आम আম, बंगाली आमा, আম कन्नडा मावू ಮಾವು , काश्मिरी अम्ब्, कोंकणी आंबॉ, मल्याळम मावू മാവു് मणिपुरी अंबा, संस्कृत आम्र, चूत, सिंहल अंबा, तमिळ मांगाई மாங்காய், तेलुगु आम्रामू ఆమ్రము असे म्हणतात. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम असतो. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे. परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधे मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा जीवाश्मांचा इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते. वेग वेगळ्या भागात राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे पिकतात. गोव्यात मानकुराद आंबा पिकतो.
कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात. कैरी ही नेहमीच चवीला आंबट असते, पण जर नसेल तर तिला 'खोबरी कैरी' असे नाव आहे. आंबा फळाचा राजा आहे. दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत सजावटीसाठी वापरतात. आंबा हे भारत आणि पाकिस्तान या देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे.
जगाच्या आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंब्याचे उत्पादन एकट्या भारतात होते. भारतात आंब्याच्या जवळपास १३०० जातींची नोंद आहे. परंतु २५ ते ३० जाती या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. नीलम व हापूस यांच्या संकरीकरणातून कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना ही जात विकसित केली आहे. गुजरात राज्यातील केशर हे वाण महाराष्ट्रातील कोरडवाहू पट्ट्यामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. दक्षिण भारतातील तोतापुरी, आंध्रप्रदेशामध्ये बैंगणपल्ली, उत्तर प्रदेशामध्ये दशेरी, लंगडा, दक्षिणेत नीलम, पायरी, मलगोवा या जाती प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त संशोधन केंद्राने दशेरी व नीलम यांच्या संकरामधून आम्रपाली आणि नीलम व दशेरी यांच्या संकरामधून मल्लिका ही जात विकसित केली आहे. कोकण विद्यापीठाने बिनकोयीची सिंधू ही जात विकसित केली आहे. पश्चिम महाराष्ट्रमध्ये केशर या आंब्याच्या जातीची लागवड वाढली आहे.
आंबा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?