अरुण गद्रे

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

डॉ. अरुण गद्रे (जन्म : ११ ऑक्टोबर, इ.स. १९५७) हे एक स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर असून मराठी लेखक आहेत. त्यांची चार पुरस्कारप्राप्त कादंबऱ्या धरून, एकूण ११हून अधिक मराठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याशिवाय, त्यांच्या नावावर सर्वसाधारण वाचकांसाठी लिहिलेली तीन आरोग्यविषयक पुस्तके आणि दोन पाठ्यपुस्तके आहेत. त्यांनी काही हिंदी पुस्तकेही लिहिली आहेत.

मध्यम वर्गात जन्म घेतलेल्या अरुण गद्रे यांचे शालेय शिक्षण मुंबईतील एका नामवंत शाळेत झाले. एस्‌‍एस्‌‍सी परीक्षेत ते गुणवत्ता यादीत येऊन उत्तीर्ण झाले. त्याप्रसंगी रेडिओवर झालेल्या त्यांच्या मुलाखतीत त्यांनी डॉक्टर होऊन खेड्यात व्यवसाय करण्याची त्यांची मनीषा बोलून दाखविली होती.

मुंबईतील ग्रॅन्ड मेडिकल कॉलेजातून अरुण गद्रे यांनी एम्‌बीबीएस केले. तेथेच महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाचे सभासद असल्याने त्यांना मराठी वाचनाची गोडी लागली. ते एकांकिका लिहू लागले, आणि त्यांचे सहकारी त्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये साभिनय सादर करू लागले. त्या पाहून प्रेक्षक बहुधा हुर्रे उडवीत, पण काही झाले तरी तो लक्षात राहण्यासारखा अनुभव होता.

कॉलेजचे प्राध्यापक मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या कामात ढवळाढवळ करीत नसत. त्यामुळे अरुण गद्रे यांचे ते आयुष्य सुखात गेले. जनरल सर्जरी हा विषय न मिळाल्यामुळे गद्रे यांना नाइलाजाने स्त्रीरोगचिकित्सा हा विषय घेऊन एम.डी. करावे लागले.

एम.डी. झाल्यावर गद्रे यांनी बाबा आमटे यांच्या सल्ल्याने दुष्काळी भागातील एका लहान खेड्यात आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्यांच्या पत्‍नी डॉ. ज्योती गद्रे या भूलतज्ज्ञ असून, पुण्यात व्यवसाय करतात.

डॉ. अरुण गद्रे वृत्तपत्रांतून वैचारिक व अन्य लेखनही करतात. त्यांचा पुण्याच्या दैनिक सकाळच्या ’सप्तरंग’ या पुरवणीत 'डॉक्‍टरांनो, याही बाजू तपासा' हा लेख १० जून २०१२ला प्रकाशित झाला. १७जून २०१२ च्या ’सप्तरंग’मध्ये डॉ गद्रे यांचा ’साबणासारखी विकली जातेय आरोग्यसेवा!’ हा आणखी एक अनुभवसिद्ध लेख प्रकाशित झाला, तोही वाचकानी वाखाणला. त्यावर महाराष्ट्रभरातून शेकडो प्रतिसाद आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →