अभ्यासयोजना (अभ्यासक्रम): शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जे जे संस्कारकारी अनुभव योजतात, त्या सर्वांचा समावेश अभ्यासक्रमात होतो. ज्ञान घेणे, कौशल्य संपादणे, प्रयोग, व्यवसाय वा कृती करणे, असे या अनुभवांचे विविध स्वरूप असते. अभ्यासक्रम साधन होय, साध्य नव्हे म्हणून तो उद्दिष्टांच्या अंकित असतो. उदा., ‘प्रत्येक व्यक्तीच्या अंगी स्वतःचे विचार प्रकट करण्याचे व दुसऱ्यांचे विचार समजून घेण्याचे सामर्थ्य असावे’ हे शिक्षणाचे एक उद्दिष्ट असते, म्हणून मातृभाषेच्या अभ्यासाला अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान देतात. ‘मुलांना आत्मनियंत्रण करता यावे’ हे लोकशाही शासनाचे शैक्षणिक उद्दिष्ट असते. म्हणून अभ्यासक्रमात ‘मुलांचे स्वराज्य चालविणे’ हा अनुभव समाविष्ट करतात. हुकूमशाही शासनाची शिक्षण योजना असे अनुभव समावेश्य समजत नाही.
शिक्षणाच्या अवस्थेनुसार उद्दिष्टे बदलतात, म्हणून अभ्यासक्रमही बदलतो. प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट बालकाला ज्ञानार्जनाची मूलभूत साधने प्राप्त करून देणे हे असते. म्हणून तेथील अभ्यासक्रमात लेखन, वाचन, गणन या कौशल्यांना प्राधान्य असते. माध्यमिक शिक्षणाचे उद्दिष्ट बालकांच्या नैसर्गिक क्षमतेचे अन्वेषण करून तदनुसार शैक्षणिक अनुभव पुरविणे हे असते. म्हणून तेथील अभ्यासक्रमात अनेक विषय वैकल्पिक असतात. उच्च शिक्षणाचे ध्येय पारंगतता असल्यामुळे तेथील अभ्यासक्रमात एका विषयाच्या सखोल अभ्यासक्रमाची अपेक्षा असते. प्रत्येक अवस्थेत वर उल्लेखिलेल्या उद्दिष्टांखेरीज काही सामान्य उद्दिष्टे असतात. उदा.,‘आदर्श नागरिक घडविणे’ हे उद्दिष्ट सर्व अवस्थांना सामान्य आहे. अशी सामान्य उद्दिष्टे साधणाऱ्या अनुभवांचाही अंतर्भाव अभ्यासक्रमात होतो.
तथापि अवस्थानुसार अभ्यास योजना करताना पुढील दोन तत्त्वे पाळावी लागतात :
(१) प्रत्येक अवस्थेच्या शेवटी जे विद्यार्थी जीवनात प्रवेश करतात, अशांसाठी अभ्यास योजना स्वयंपूर्ण असावी.
(२) ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पुढील अवस्थेत चालू राहणार असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यास योजना दोन्ही अवस्थांचा सांधा साधणारी, पहिल्या अवस्थेची उद्दिष्टे साधणारी व पुढील अवस्थेच्या शिक्षणाची पूर्वतयारी करणारी असावी.
महाराष्ट्रात प्राथमिक शाळेचा विद्यार्थी भाषा, अंकगणित, जमाखर्च, भूमिती, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल व हिंदी हे विषय शिकतो. शिवाय त्याला सूतकाम, शिंपीकाम, सुतारकाम, कृषिविद्या, भरतकाम यांपैकी एक व्यवसाय हस्तगत करावा लागतो. ज्ञानार्जनाची साधने हस्तगत करणे व नागरिकासाठी आवश्यक ते ज्ञान संपादन करणे, हा दुहेरी उद्देश या अभ्यासक्रमाच्या रचनेत आढळतो. माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी चार विषय आवश्यक असतात व तीन अथवा चार वैकल्पिक असतात. आवश्यक विषय पुढील होत : १. मातृभाषा, २. हिंदी, ३-४. समाजशास्त्र, सामान्य विज्ञान, प्राथमिक गणित, बीजगणित, भूमिती व जमाखर्च यांपैकी दोन. वैकल्पिक तीन वा चार विषय साठ विषयांतून निवडावयाचे असतात. या साठांत इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, युद्धशास्त्र, वाणिज्य, कृषिविद्या, तंत्रविद्या, संगीत इ. विषय मोडतात. सारांश, माध्यमिक शाळेच्या अभ्यासक्रमात सामान्य उद्दिष्टांसाठी आवश्यक विषय व विद्यार्थ्यांची क्षमता व आवड यांना अनुसरून ऐच्छिक विषय असे दोन भाग वर उल्लेखिलेल्या तत्त्वांनुसार आढळतात. महाविद्यालयीन अभ्यास योजनेतही एकूण विषयांची संख्या ठराविक असून तिच्यामध्ये काही आवश्यक व काही ऐच्छिक असतात.
अभ्यासयोजना
या विषयावर तज्ञ बना.