अंजीर (शास्त्रीय नाव: Ficus carica, फायकस कॅरिका; इंग्लिश: Common fig, कॉमन फिग) हे एका मोठ्या आकाराचे झुडूप असते. हे झाड नैऋत्य आशिया आणि पूर्व भूमध्य भागात (ग्रीस ते अफगाणिस्तानापर्यंत) आढळते. हे झाड साधारणतः ३ ते १० मीटर उंच वाढते. याचा खोड करड्या रंगाचे असते. या झुडपाची पाने १२ ते २५ सेंमी लांब आणि १० ते १८ सेंमी रुंद असतात.
अंजिराचे फळ ३ ते ५ सेंमी लांब असते. हे फळ कच्चे असताना त्याची साल हिरवी असते, तर ते पिकू लागल्यावर त्याचा रंग अंजिरी होऊ लागतो. या झाडाच्या चिकाने माणसाची त्वचा जळजळते.
अंजिराचे झाड लहान आणि पर्णपाती (पाचोळा गाळणारे) स्वरूपाचे असते. तुर्कस्तान आणि भूमध्य समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात याचे उगमस्थान मानले जाते. भूमध्यसागरीय किनारपट्टीवरील देश आणि तेथील हवामानात हे चांगल्या प्रकारे येते. हे प्राचीन काळातील वृक्षांपैकी एक आहे आणि प्राचीन काळातील लोकही याला खूप पसंत करत असत. ग्रीसच्या लोकांनी हे कॅरिया (आशिया मायनरमधील एक प्रदेश) येथून आणले, म्हणून याच्या प्रजातीचे नाव कॅरिका पडले. रोममधील लोक या वृक्षाला भविष्यातील समृद्धीचे प्रतीक मानत असत व त्याचा आदर करत असत. स्पेन, अल्जीरिया, इटली, तुर्कस्तान, पोर्तुगाल आणि ग्रीसमध्ये याची शेती व्यावसायिक स्तरावर केली जाते.
नासपतीच्या (नाशपाती) आकाराच्या या छोट्याशा फळाला स्वतःचा काही विशेष तीव्र सुगंध नसतो, पण हे रसदार आणि गरयुक्त असते. रंगाने हे फळ हलके पिवळे, गडद सोनेरी किंवा गडद जांभळे असू शकते. सालीच्या रंगाचा चवीवर काहीही परिणाम होत नाही, परंतु याची चव हे फळ कोठे उगवले आहे आणि किती पिकले आहे यावर अवलंबून असते. हे फळ संपूर्ण सालीसह, बिया आणि गरासकट खाता येते. घरगुती उपचारांमध्ये असे मानले जाते की जुनाट बद्धकोष्ठता (कोठ्ठा साफ न होणे) अंजीर खाल्ल्याने दूर होते. सर्दी आणि फुफ्फुसांच्या आजारात पाच अंजीर पाण्यात उकळून, गाळून ते पाणी सकाळी व संध्याकाळी प्यावे. ज्या दम्यामध्ये कफ निघतो, त्यात अंजीर खाणे फायदेशीर ठरते; त्यामुळे कफ बाहेर पडण्यास मदत होते.
कच्ची अंजिरे खोलीच्या तापमानावर पिकवता येतात, परंतु त्यामुळे त्याला नैसर्गिक चव येत नाही.
अंजीर हे कॅल्शियम, फायबर (तंतूमय पदार्थ) आणि जीवनसत्त्व ए, बी, सी यांनी समृद्ध असते. एका ताज्या अंजिरामध्ये सुमारे ३० कॅलरीज असतात. एका वाळलेल्या अंजिरामध्ये ४९ कॅलरीज, ०.५७९ ग्रॅम प्रथिने (प्रोटीन), १२.४२ ग्रॅम कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स), २.३२ ग्रॅम फायबर, ०.२२२ ग्रॅम एकूण चरबी (फॅट), ०.०४४५ ग्रॅम संपृक्त चरबी (सॅच्युरेटेड फॅट), ०.१०६ ग्रॅम बहु-असंपृक्त चरबी, ०.०४९ ग्रॅम एक-असंपृक्त चरबी, २ मिग्रॅ सोडियम आणि जीवनसत्त्व ए, बी, सी असतात. यामध्ये ८३ टक्के साखर असल्याने हे जगातील सर्वात गोड फळांपैकी एक मानले जाते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी इतर फळांपेक्षा अंजिराचे सेवन विशेष फायदेशीर ठरते. अंजीर हे पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे, जे रक्तदाब आणि रक्तातील शर्करा नियंत्रित करण्यास मदत करते. अंजिरामधील फायबर वजन संतुलित ठेवण्यास आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतो; तसेच स्तनांचा कर्करोग आणि रजोनिवृत्तीच्या (मेनोपॉज) तक्रारी दूर करण्यास साहाय्यक ठरतो. वाळलेल्या अंजीरामध्ये फिनॉल, ओमेगा-३ आणि ओमेगा-६ असते. हे मेदाम्ल (फॅटी ॲसिड) हृदयाच्या विकारांचा (कोरोनरी हार्ट डिसीज) धोका कमी करण्यास मदत करते. अंजिरामध्ये कॅल्शियम विपुल प्रमाणात असते, जे हाडे मजबूत करण्यास साहाय्य करते. अंजिरामध्ये पोटॅशियम जास्त आणि सोडियम कमी असते, त्यामुळे हे उच्च रक्तदाबाची समस्या दूर करते. अंजिराच्या सेवनाने मधुमेह, सर्दी-खोकला, दमा आणि अपचन यांसारख्या अनेक व्याधींवर लाभ होतो.
अंजीर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.