होमिओपॅथी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

होमिओपॅथी

होमिओपॅथी ही एक ॲलोपॅथीला पर्यायी असणारी औषधोपचार पद्धती आहे असा समज असून, तिची सुरुवात, १७९० साली डॉ. सामुएल हानेमान ह्या जर्मन वैद्याने केली. "समानाला समान बरे करते" (लॅटिन: Similia Similibus Curenture), या मूलभूत तत्त्वावर होमिओपॅथी आधारलेली आहे. म्हणजे लोखंडाने लोखंड कापावे, काट्याने काटा काढावा किंवा विषाने विष उतरवावे हे ते तत्त्व आहे. त्यामुळे या चिकित्सा पद्धतीला समचिकित्सा असेही म्हंटले जाते. समचिकित्सेच्या नियमानुसार, निरोगी माणसाने एखाद्या रासायनिक किंवा जैविक पदार्थाचे सेवन केल्यामुळे त्याच्या शरीरात विशिष्ट आजाराची लक्षणे उद्भवत असतील, तर होमिओपॅथीनुसार त्या आजारावर (किंवा तत्सम लक्षणे असलेल्या आजारावर) औषध म्हणून तोच पदार्थ सूक्ष्म प्रमाणात दिला जातो.

होमिओपॅथी या शब्दाची फोड पुढील प्रमाणे होते. होमिओस म्हणजे सारखे आणि पॅथॉस म्हणजे रोग अथवा रोगलक्षणे. जे रोग अन्य औषधोपचारपद्धतीला दाद देत नाहीत ते रोग बरे करण्याचा दावा होमिओपॅथीमध्ये केला जातो. उदा० संधिवात, सांधेदुखी, मधुमेह इत्यादी.



होमिओपॅथीमध्ये सर्व आजारांसाठी वापरले जाणारे समचिकित्सेचे तत्त्व आधुनिक विज्ञानाच्या कोणत्याही कसोटीवर उतरू शकलेले नाही आणि आधुनिक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राच्या आणि जीवशास्त्राच्या मान्यताप्राप्त तत्त्वांशी हे तत्त्व सुसंगत नाही. समचिकित्सा तत्त्वावर आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये (ॲलोपथीमध्ये) काही रोगप्रतिबंधक लसी तसेच प्रतिजैवके तयार केली जातात, परंतु ती नेहमीच लागू पडतात असे नाही. (उदा. एड्सचे विषाणू वापरून एड्सची रोगप्रतिबंधक लस तयार करता येत नाही.) आणि रोगप्रतिबंधक लसी अनेक वैज्ञानिक चाचण्या वापरून तपासल्या जातात. होमिओपॅथीमध्ये तसे होत नाही, त्यामुळे होमिओपॅथी हे एक छद्म विज्ञान मानले जाते आणि होमिओपॅथी औषधोपचारामुळे रोग्यावर दिसणारे परिणाम हे अन्य कारणाने होतात असे ॲलोपॅथिस्ट मानतात.



होमिओपॅथीचा शोध लावण्यापूर्वी सामुएल हानेमान याने केलेल्या प्रयोगांत त्याला बार्क ऑफ चायना म्हणजे सिंकोना नावाच्या वनस्पतीचा रस प्यायल्यावर स्वतःमध्ये मलेरियाची लक्षणे दिसून आली होती. परंतु सिंकोना हे औषध मलेरिया रोग बरा करण्यासाठी वापरत असत. रसामध्ये घातलेले पाणी औषधाचे गुणधर्म स्मरणात ठेवून त्याप्रमाणे रुग्णास गुण देत असले पाहिजे असा हानेमानाने तर्क केला. होमिओपॅथीमध्ये मूळ औषध जसेच्या तसे न देता ते सौम्य करण्यासाठी पाण्यात किंवा अल्कोहोलमध्ये त्याचे वारंवार विरलन करून दिले जाते. जितके जास्त विरल तेवढे औषध जास्त प्रभावी (पोटेन्ट) अशी होमिओपॅथीमध्ये समजूत आहे. हे विरलन जवळपास नेहमीच इतके प्रचंड असते की मूळच्या औषधाचा एक रेणूदेखील शेवटी तयार झालेल्या औषधात शिल्लक नसतो. "कोणत्याही पदार्थाचे रासायनिक व भौतिक गुणधर्म कायम ठेवून त्याचे एका विशिष्ट मर्यादेपलीकडे विभाजन करता येत नाही" हे आधुनिक विज्ञानात आजकाल सर्वमान्य असलेले तत्त्व हानेमानच्या कालखंडामध्ये पूर्णतः मान्य झालेले नव्हते, त्यामुळे औषधी पदार्थाचे अनंतपटीने विरलन करणे शक्य आहे अशी हानेमानची समजूत असणे शक्य आहे. परंतु भौतिकशास्त्राच्या मूलभूत कसोट्यांवर होमिओपॅथीची ही समजूतदेखील अवैज्ञानिक म्हणून गणली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →