हाऊस (ज्याला हाऊस, एमडी देखील म्हणतात) ही एक अमेरिकन वैद्यक क्षेत्रातील नाट्यावर आधारलेली दूरचित्रवाणी मालिका आहे. तिचे आठ सीझन फॉक्स नेटवर्कवर 16 नोव्हेंबर 2004 ते 21 मे 2012 पर्यंत दाखवले गेले. या मालिकेतील मुख्य पात्र डॉ. ग्रेगरी हाऊस ( ह्यू लॉरी ), हे आहे. हा एक परंपरेला छेद देणारा, थोडासा दुष्ट प्रवृत्तीकडे झुकणारा परंतु असामान्य वैद्यकीय प्रतिभा असलेला डॉक्टर आहे. त्याला वेदनाशामक औषधांचे व्यसन असूनही तो, न्यू जर्सी मधील काल्पनिक प्रिन्स्टन-प्लेन्सबोरो टीचिंग हॉस्पिटल (PPTH) येथे रोगनिदान करणाऱ्यांच्या टीमचा प्रमुख आहे. या मालिकेची प्रमुख कल्पना पॉल अटानासिओ यांची आहे. तर यातील मुख्य पात्राच्या निर्मातीचे श्रेय डेव्हिड शोर यांना दिले जाते.
मालिकेच्या कार्यकारी निर्मात्यांमध्ये शोर, अटानासिओ, अटानासिओचा व्यवसाय भागीदार केटी जेकब्स आणि चित्रपट दिग्दर्शक ब्रायन सिंगर यांचा समावेश होता. या मालिकेचे चित्रीकरण प्रामुख्याने लॉस एंजेलस काउंटीच्या वेस्टसाइड मधील सेंच्युरी सिटी नावाच्या भागात करण्यात आले. ही मालिका समीक्षकांकडून प्रशंसली गेली व युनायटेड स्टेट्समधील सातत्याने सर्वोच्च रेटिंग मिळविलेल्या मालिकांमध्ये तिची गणना केली जाते.
हाऊस अनेकदा त्याच्या सहकारी डॉक्टरांशी आणि त्याच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या डॉक्टरांशी संघर्ष करतो. याचे मुख्य कारण म्हणजे रुग्णांच्या आजारांबद्दलची त्याची अनेक गृहीते ही सूक्ष्म किंवा विवादास्पद अंतर्दृष्टीवर आधारित असतात. त्याची बॉस, रुग्णालयाची प्रशासक आणि मेडिसिनची डीन डॉ. लिसा कडी ( लिसा एडेलस्टीन ) हिच्याशी त्याचा, रुग्णालयाच्या नियमांचे आणि कार्यपद्धतींचे उल्लंघन केल्याने वारंवार संघर्ष होतो. हाऊसचा एकमेव खरा मित्र ऑन्कोलॉजी विभागाचा प्रमुख डॉ. जेम्स विल्सन ( रॉबर्ट शॉन लिओनार्ड ) हा आहे.
पहिल्या तीन सीझनमध्ये, हाऊसच्या डायग्नोस्टिक टीममध्ये डॉ. रॉबर्ट चेस ( जेसी स्पेन्सर ), डॉ. ॲलिसन कॅमेरॉन ( जेनिफर मॉरिसन ) आणि डॉ. एरिक फोरमन ( ओमर एप्स ) यांचा समावेश आहे. तिसऱ्या सत्राच्या शेवटी, हा संघ विखुरला जातो. परंतु पुढे डॉ. फोरमन यांना पुन्हा सामील करून, हळूहळू हाऊस तीन नवीन टीम सदस्यांची निवड करतो: डॉ. रेमी "थर्टीन" हॅडली ( ऑलिव्हिया वाइल्ड ), डॉ. ख्रिस टॉब ( पीटर जेकबसन ) आणि डॉ. लॉरेन्स कुटनर ( काल पेन ). चेस आणि कॅमेरॉन हॉस्पिटलमध्ये अधूनमधून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत रहातात. पाचव्या हंगामात शेवटी शेवटी कुटनरचे निधन होते; सहाव्या सीझनच्या सुरुवातीला, कॅमेरॉन हॉस्पिटलमधून निघून जाते आणि चेस डायग्नोस्टिक टीमकडे परत येतो. सातव्या हंगामातील बराच काळ थर्टीन रजा घेते, आणि तिची जागा वैद्यकीय विद्यार्थिनी मार्था एम. मास्टर्स ( अंबर टॅम्बलिन ) ही घेते. कडी आणि मास्टर्स आठव्या सिझनच्या आधी निघून जातात; फोरमन मेडिसिनचा नवीन डीन बनतो, तर डॉ. जेसिका ॲडम्स ( ओडेट ॲनेबल ) आणि डॉ. ची पार्क ( शार्लिन यी ) हाऊसच्या टीममध्ये सामील होतात.
युनायटेड स्टेट्समधे, दुसऱ्या सीझनपासून चौथ्या सीझनपर्यंत हाऊस टॉप 10 मालिकांमध्ये होता. ही मालिका 66 देशांमध्ये वितरित केली गेली व 2008 मध्ये ही मालिका जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी म्हणून गणली गेली. .हाऊस शोला पाच प्राइमटाइम एम्मी पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार, एक पीबॉडी पुरस्कार आणि नऊ पीपल्स चॉईस पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले. 8 फेब्रुवारी 2012 रोजी, फॉक्सने जाहीर केले की, तेव्हा सुरू असलेला आठवा सीझन, शेवटचा असेल. 21 मे 2012 रोजी मालिकेचा शेवटचा भाग व त्यानंतर एक तासाचा पूर्वलक्ष्यी भाग प्रसारित झाला.
हाऊस (दूरचित्रवाणी मालिका)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.