व्हिव्हियन ली (इंग्लिश: Vivien Leigh; ५ नोव्हेंबर १९१३ - ८ जुलै १९६७) ही एक भारतात जन्मलेली ब्रिटिश चित्रपट अभिनेत्री होती. तिचे वडील कलकत्त्याला पिगॉट चॅपमन या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते. ते आधुनिक विचारसरणीचे आणि कलासक्त वृत्तीचे होते. आई मेरी फ्रान्सिस ही परंपरावादी विचारसरणीची होती. व्हिव्हियन घरात एकटीच, साहजिकच तिचे फार लाड झाले. त्यामुळे ती हट्टी, एकलकोंडी आणि आक्रस्ताळी झाली. भारतात उटकमंड, देहरादून येथे शिक्षण घेतल्यावर ती उच्च शिक्षणासाठी लंडनला आली. आणि त्याच काळात तिला नाटके पाहण्याची गोडी लागली. रंगभूमीवर आपणही अभिनय करावा असे वाटून तिने आईच्या विरोधाला दुर्लक्षून १०३१मध्ये ’रॉयल ॲकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स’मध्ये प्रवेश घेतला.; मात्र वर्षभरातच तिने अभिनयाचे शिक्षण सोडून दिले आणि प्रतिष्ठित संपन्न घराण्यातल्या, बुद्धिमान व समंजस वृत्तीच्या बॅरिस्टर हर्बर्ट ली हॉलमनशी लग्न केले. तेव्हा व्हिव्हियन १९ वर्षाची होती आणि हॉलमन तिशीतला.
एक मूल झाल्यावर व्हिव्हियन हिने परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. आणि तिची पतीशी भांडणे होऊ लागली. पुढे तिची शेक्सपियरच्या नाटकांतून कामे करणाऱ्या ऑलिव्हिएशी मैत्री झाली आणि तिने ३१ ऑगस्ट १९४० रोजी ऑलिव्हिएशी विवाह केला.
व्हिव्हियन लीला १९३९ साली प्रदर्शित झालेल्या गॉन विथ द विंड ह्या व १९५१ साली प्रदर्शित झालेल्या अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर ह्या चित्रपटांमधील प्रदर्शनासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
गॉन विथ द विंड चित्रपटातील तिने साकारलेली स्कारलेट ओ'हाराची भूमिका तिची सर्वात मोठी ओळख ठरली. ती आपल्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. गॉन विथ द विंडला एकून दहा ऑस्कर मिळाले होते, त्यांतला एक व्हिव्हियनला मिळाला.
ऑलिव्हिएशी घटस्फोट घेतल्यावर व्हिव्हियन सात वर्षे जगली. या काळात तिला वेडाचे झटके येऊ लागले आणि क्षय शरीरभर पसरू लागला. ती जेव्हा नाटकांत काम करीत नसे तेव्हा घरातच अंधारात उदासवाणी बसू लागली. ए डेलिकेट बॅलन्स या नाटकातले काम संपवून मध्यरात्री ती घरी आली आणि झोपेतच केव्हातरी मरण पावली. तो दिवस ७ जुलै १९६३ होता.
व्हिव्हियन ली
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.