रेडवूड राष्ट्रीय आणि राज्योद्याने तथा रेडवूड नॅशनल अँड स्टेट पार्क्स हा अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीवरील अमेरिकन राष्ट्रीय उद्यान आणि तीन कॅलिफोर्निया राज्योद्यानांचा एकत्रित परिसर आहे. या संयुक्त संकुलात रेडवूड नॅशनल पार्क, देल नोर्ते कोस्ट रेडवूड्स स्टेट पार्क, जेडेडाइयाह स्मिथ रेडवूड्स स्टेट पार्क, आणि प्रेरी क्रीक रेडवूड्स स्टेट पार्क यांचा समावेश होतो. १,३९,००० एकर (५६० किमी²) विस्ताराची ही उद्याने जगातील उरलेल्या शेवटच्या जुन्या रेडवूड जंगलांपैकी ४५ टक्के भाग व्यापतात.
देल नोर्ते आणि हंबोल्ट काउंट्यांमध्ये पसरलेली ही चार उद्याने धोकादायक किनारी रेडवूड (सेक्वॉइया सेम्परव्हिरेन्स) वृक्षांचे संवर्धन करतात. ही झाडे पृथ्वीवरील सर्वात उंच, अत्यंत प्राचीन आणि अवाढव्य वृक्ष प्रजातींपैकी एक आहेत आणि येथील समशीतोष्ण पर्जन्यवनांमध्ये वाढतात. हा उद्यान प्रदेश भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत सक्रिय असून त्सुनामीप्रवण आहे. ही उद्याने ३७ मैल (६० किमी) लांबीची निसर्गरम्य किनारपट्टी, तेथील मूळ वनस्पती, प्राणी, गवताळ प्रदेश, सांस्कृतिक संसाधने, जलमार्ग, तसेच चिनूक सामन मासा, उत्तरी ठिपक्यांचे घुबड आणि स्टेलर्स सी लायन यांसारख्या धोक्यात आलेल्या प्राणिप्रजातींना अभय देतात.
पूर्वी रेडवूडच्या जंगलांनी कॅलिफोर्निया किनारपट्टीचा ८,१०्० किमी² पेक्षा जास्त भाग व्यापला होता. आजच्या उद्यानांचा प्रदेश १८५० नंतरच्या काळापर्यंत मुख्यत्वे वन्य स्थिती राखलेला आहे. कॅलिफोर्नियातील सुवर्णशोध आणि त्याला जोडून सुरू झालेल्या लाकूड व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात आलेल्या उपऱ्यांचा तेथील मूळ रहिवाशांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला. मोठ्या प्रमाणावर झालेल्या व्यावसायिक हालचाली आणि त्यानंतरच्या दशकांमध्ये झालेल्या अनिर्बंध जंगलतोडीला प्रतिसाद म्हणून तीव्र पर्यावरण संवर्धन चळवळ उभारली गेली. १९२० च्या दशकात सेव्ह द रेडवूड्स लीग या संस्थेने प्रेरी क्रीक, देल नोर्ते कोस्ट आणि जेडेडिया स्मिथ रेडवूड्स राजोद्यानांच्या निर्मितीत मोलाची मदत केली. या लीग आणि सिएरा क्लबच्या प्रयत्नांमुळे अमेरिकेच्या काँग्रेसने १९६८ मध्ये रेडवूड नॅशनल पार्कची स्थापना केली आणि १९७८ मध्ये त्याचा विस्तार केला. १९९४ मध्ये नॅशनल पार्क सर्व्हिस आणि कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ पार्क्स अँड रिक्रिएशन यांनी रेडवूड नॅशनल पार्कला लगतच्या तीन राजोद्यानांसह एकाच प्रशासकीय घटकात घातले. उद्यानाचे अलीकडील व्यवस्थापन रेडवूडच्या जंगलांना १८५० पूर्व स्थितीमध्ये आणण्याचा आणि तसेच ठेवण्याचा प्रयत्न करते. जंगलातील वणव्यांचा धोका कमी करण्यासाठी येथे नियंत्रित वणवे लावले जातात.
या उद्यानांमधील दुर्मिळ परिसंस्था आणि सांस्कृतिक इतिहासाची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रांनी १९८० मध्ये त्यांना जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले. तेथील स्थानिक आदिवासी जमातींनी २०२३ मध्ये उद्यान परिसर, किनारपट्टी आणि किनारी सागरी प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी एक इंडीजीनस मरीन स्टुअर्डशिप एरिया घोषित केला. या उद्यानात प्रवेश मोफत आहे, आणि भेट देणारे पर्यटक उद्यानातील सुमारे २०० मैल (३२० किमी) लांबीच्या पायवाटांवर कॅम्पिंग, ट्रेकिंग, सायकलिंग आणि घोडेस्वारीचा आनंद घेऊ शकतात.
रेडवूड राष्ट्रीय आणि राज्योद्याने
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.