राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थाने (National Institutes of Technology, नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी) ह्या भारतातील अव्वल दर्जाच्या अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणाच्या संस्था आहेत. रीजनल इंजिनियरींग कॉलेज ह्या नावाने पूर्वी ओळखल्या जात असलेल्या ह्या १७ संस्थाचे अद्ययावत शैक्षणिक व अनुसंधान केंद्रांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने २००२ साली घेतला. २००७ साली भारत सरकारने राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांना राष्ट्रीय महत्त्व असलेल्या संस्था असा दर्जा दिला. सध्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थानांखालोखाल राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थाने देशामधील सर्वोत्तम सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालये मानली जातात.
भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये १ अशी एकूण ३० स्वायत्त दर्जाची राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थाने सध्या देशात कार्यरत आहेत. ह्या शैक्षणिक संस्थानांमध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्राच्या अनेक शाखांमध्ये पदवी, उच्चपदवी व डॉक्टरेट हे तीन शैक्षणिक कार्यक्रम चालवले जातात. कोणत्याही इतर विद्यापीठासोबत संलग्न नसणाऱ्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थाना संपूर्ण स्वायत्तता दिली गेली असून अभ्यासक्रम ठरवण्याचे सर्व अधिकार त्यांना आहेत. येथे प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना जॉइंट एन्ट्रन्स एक्झॅमिनेशन (जे.ई.ई.) ही परिक्षा द्यावी लागते.
राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?