मोरी तथा स्क्वॉलिडे, डॉगफिश, डॉग शार्क किंवा स्पायनी डॉगफिश हे स्क्वॉलिफॉर्म्स या वर्गवारीतील शार्क माशांची एक प्रमुख उपजाती आहे. स्कॉलिफॉर्म्स ही शार्क माशांचा दुसरी सर्वात मोठी उपजाती असून त्यात ७ वर्गांमध्ये ११९ प्रजातींचा समावेश होतो. कोळ्यांच्या मते हे मासे कुत्र्यांप्रमाणे टोळीने लहान माशांचा पाठलाग करताना दिसल्यामुळे त्यांना 'डॉगफिश' हे नाव मिळाले. डॉगफिशचे शरीर सुटसुटीत, प्रवाही (स्ट्रीमलाइंड) आणि इतर शार्क प्रजातींच्या तुलनेत सहसा अधिक लहान व टोकादार तोंडाचे असते. डॉगफिशला पाठीवर दोन पंख (डॉर्सल फिन्स) असतात, ज्यावर गुळगुळीत काटे असतात; परंतु त्यांना गुदपंख (ॲनल फिन) नसतो. त्यांची त्वचा सहसा स्पर्शाला खडबडीत असते. हे मासे प्रौढ झाल्यावर नर माशांची लांबी जास्तीत जास्त १०० सेंमी (३९ इंच) असते, तर मादी माशांची लांबी सहसा १२५ सेंमी (४९ इंच) असते. त्यामुळे या प्रजातीत मादीचे वर्चस्व असणारे लैंगिक द्विरूपता (सेक्स्युअल डायमॉर्फिझम) दिसून येते.
डॉगफिश शार्कची त्वचा स्लेट-राखाडी किंवा राखाडी-तपकिरी रंगाची असते, ज्यावर पांढरे ठिपके असतात. पोटाच्या भागाकडे हा रंग उजळ (जवळजवळ पांढरा) होतो. या शार्कच्या वैशिष्ट्यांमध्ये वरच्या आणि खालच्या जवढ्यांमधील समान आकाराचे दात, बाजूला कडा असणारा पुच्छ वृत्त (कॉडेल पेडंकल), वरच्या बाजूला असणारा प्रीकॉडेल खड्डा आणि सबटर्मिनल खाच नसलेला पुच्छ पंख (कॉडेल फिन) यांचा समावेश होतो.
हे मासे मांसाहारी असून मुख्यतः स्वतःपेक्षा लहान असलेल्या जीवांची शिकार करतात. त्यांच्या भक्ष्यामध्ये हेरिंग, मॅकरेल आणि कॅपेलिन माशांचा समावेश होतो. विशेष प्रकरणांमध्ये ते जेलीफिश आणि स्क्विड (कॅलमारी) देखील खातात. अगदी लहान वयातही स्पायनी डॉगफिशची पिल्ले स्वतःच्या आकारापेक्षा दोन किंवा तीन पट मोठ्या माशांची शिकार करू शकतात. इतर जवळपास सर्व शार्क प्रजातींपेक्षा वेगळे म्हणजे डॉगफिश शार्ककडे विष असते, जे त्यांच्या पाठीवरील काट्यांवर पसरलेले असते; हे विष मानवांसाठी सौम्य प्रमाणात विषारी असते आणि हाताळणी व्यवस्थित न झाल्यास इजा पोहोचवू शकते. स्कॉलिडे कुटुंबातील माशांच्या यकृत आणि पोटात 'स्कॉलामाइन' नावाचे संयुग असते, ज्याच्यात मानवामधील लहान रक्तवाहिन्यांची वाढ रोखण्याचा गुणधर्म असतो. डॉगफिश शार्क भक्ष्य खाण्यासाठी त्यांच्या मजबूत जवढ्याचा आणि तीक्ष्ण दातांचा वापर करतात.
स्पायनी डॉगफिशने स्थलांतर आणि गर्भाधारणाशी संबंधित अनेक विक्रम मोडले आहेत. हा शार्क अत्यंत स्थलांतरित प्रजाती मानला जातो: अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात टॅग केलेला एक शार्क पुढे जपानमध्ये आढळला, ज्याने सुमारे ८,००० किमी (५,००० मैल) प्रवास केला होता. लांब पल्ल्याच्या स्थलांतराव्यतिरिक्त, या शार्कच्या नावावर पाठीचा कणा असलेल्या (पृष्ठवंशीय) प्राण्यांमध्ये सर्वात मोठा गर्भाधारण काळ असल्याचा विक्रम आहे, जो २२ ते २४ महिने इतका असतो. मादी अंडी तयार करते आणि २०-३३ सेंमी (८-१३ इंच) आकाराच्या जिवंत पिल्लांना जन्म देते. स्कॉलिडेच्या प्रजनन चक्रात बहु-पितृत्व (मल्टीपल पॅटर्निटी) दिसून येते, जिथे अनेक नर एकाच गर्भाचे फलन (फर्टिलायझेशन) करू शकतात. यामुळे अनुवंशिक विविधता वाढण्यास मदत होते, जी मासेमारीच्या धोक्यामुळे या प्रजातीच्या संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे.
मोरी (मासा)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.