रत्नाकर मतकरी लिखित व सुधा करमरकर दिग्दर्शित ‘मधुमंजिरी’ या बालनाट्याचा पहिला प्रयोग २ ऑगस्ट १९५९ रोजी झाला होता. इथूनच मराठी रंगभूमीवर बालनाट्याच्या पर्वाला सुरुवात झाली. रत्नाकर मतकरींप्रमाणेच सुधा करमरकर यांचेही ‘मधुमंजिरी’ हे पहिलेच बालनाट्य होते. तिकीट विक्री करून साहित्य संघात झालेले ते पहिले व्यावसायिक बालनाट्य होते. या नाटकाच्या निमित्ताने सुधा करमरकर यांच्या लिटिल थिएटर या संस्थेचीही स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे मराठी रंगभूमीवरील पहिले बालनाट्य, या बालनाट्याचा पहिला व्यावसायिक प्रयोग आणि लिटिल थिएटर या संस्थेची स्थापना या त्रिवेणी योगावर शिक्कामोर्तब करत बालरंगभूमी परिषदेकडून २ ऑगस्ट हा दिवस ‘मराठी बालनाट्य दिवस’ म्हणून जाहीर करण्यात येऊन, विविध उपक्रमांच्या माध्यमातून बालकलाकारांच्या हक्काचा दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.
सुधाताई करमरकरांच्या सहाय्यिका लीला हडप यांच्याकडे सुधाताईंच्या हस्ताक्षरातील वारसा सापडला आणि या दिवसावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
संपूर्ण भारतामध्ये मराठी बालरंगभूमी खूप समृद्ध असून, इथे सर्वात जास्त बालनाट्यांचे प्रयोग होतात. महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ३५० पेक्षा जास्त संस्थांचे बालनाट्यांचे प्रयोग आणि अंतिम फेरीतील मिळून एकाच स्पर्धेत बालनाट्याचे ४०० हून अधिक प्रयोग होतात. याखेरीज व्यावसायिक बालनाट्यांचे तसेच शाळांच्या गॅदरींगमध्येही प्रयोग होतात. ६६ वर्षांची परंपरा लाभलेल्या बालरंगभूमीला स्वतःचा दिवस ‘मराठी बालनाट्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
आतापर्यंत इंटरनॅशनल चिल्ड्रन्स थिएटर डे साजरा केला जायचा. ज्याची तारीख परदेशातील परिषदेकडून यायची. त्या दिवशी भारतात शुभेच्छा दिल्या जायच्या. आता बालरंगभूमी आणि रंगभूमीवरील बच्चेकंपनीला आणि रंगभूमीवरील बच्चेकंपनीला हक्काचा दिवस मिळाला आहे.
मराठी बालनाट्य दिवस
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.