एलिझाबेथ ॲन फोर्ड (पुर्वाश्रमीच्या ब्लूमर, पूर्वीचे नाव वॉरेन; ८ एप्रिल, १९१८ - ८ जुलै, २०११) या राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड यांच्या पत्नी म्हणून १९७४ ते १९७७ या काळात अमेरिकेच्या प्रथम महिला होत्या. प्रथम महिला म्हणून त्या सामाजिक धोरणांमध्ये सक्रिय होत्या. यापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी राजकारणातून मुद्दामहून दूर राहत फोर्ड यांनी राजकीयदृष्ट्या सक्रिय राहून एक नवा पायंडा पाडला. जेव्हा त्यांचे पती उपराष्ट्राध्यक्ष होते, तेव्हा त्या १९७३ ते १९७४ या काळात अमेरिकेच्या द्वितिय महिला देखील होत्या.
आपल्या पतीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्या अमेरिकेच्या जनतेमध्ये लोकप्रिय होत्या. त्यांना प्रभावशाली प्रथम महिलांपैकी समजले जाते. १९७४ मध्ये मॅस्टेक्टॉमी शस्त्रक्रियेनंतर त्यांनी स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण केली. याबद्दल त्यांची प्रशंसा झाली. त्या समान हक्क दुरुस्ती कायद्याच्या एक उत्कट समर्थक होत्या. गर्भपात हक्कांच्या समर्थक आणि महिला हक्क चळवळीतील एक नेत्या म्हणून त्यांनी इतिहासातील सर्वात स्पष्टवक्त्या प्रथम महिलांपैकी एक म्हणून प्रसिद्धी मिळवली. त्यांनी स्त्रीवाद, समान वेतन, समान हक्क दुरुस्ती कायदा, लैंगिकता, अमली पदार्थ आणि गर्भपात यांसारख्या तत्कालीन ज्वलंत विषयांवर भाष्य केले. सिएना कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूटने केलेल्या इतिहासकारांच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, इतिहासकार फोर्ड यांना सर्वोत्कृष्ट आणि सर्वात धाडसी अमेरिकन प्रथम महिलांपैकी एक मानतात.
आपल्या पतीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळानंतर बेटी फोर्ड यांनी समान हक्क दुरुस्ती कायद्यासाठी पाठपुरावा करणे सुरू ठेवले आणि त्या स्त्रीवादी चळवळीत सक्रिय राहिल्या. पद सोडल्यानंतर लगेचच त्यांनी दारू आणि अमली पदार्थांच्या व्यसनाशी असलेल्या आपल्या दीर्घकाळाच्या संघर्षासाठी मदत घेतली. आपल्या व्यसनाबद्दल त्यांनी धाडसीपणे सार्वजनिकरित्या संभाषण केले. यामुळे अमेरिकेत व्यसनाधीनतेबद्दल जागरूकता निर्माण झाली. व्यसनातून बरे झाल्यानंतर त्यांनी बेटी फोर्ड सेंटरची स्थापना केली. त्या तेथील पहिल्या बोर्ड अध्यक्षा होत्या. हे केंद्र अमली पदार्थांच्या व्यसनाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी उपचार सेवा पुरवते. फोर्ड एच.आय.व्ही./एड्सशी संबंधित कार्यांमध्येही सामील झाल्या. व्हाइट हाऊस सोडल्यानंतर अनेक वर्षे फोर्ड यांचा मोठा प्रभाव आणि लोकप्रियता कायम होती, आणि १९९१ पर्यंत दरवर्षी गॅलपच्या वार्षिक सर्वाधिक प्रशंसित महिला सर्वेक्षणात त्या पहिल्या दहामध्ये स्थान मिळवत राहिल्या.
फोर्ड यांना १९९१ मध्ये जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांच्या हस्ते प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम प्रदान करण्यात आले. तसेच, १९९८ मध्ये त्यांना राष्ट्राध्यक्ष फोर्ड यांच्यासोबत संयुक्तपणे काँग्रेस गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
बेटी फोर्ड
या विषयावर तज्ञ बना.