बुद्धिबळ हा दोन खेळाडूंनी एका तक्त्यासारख्या पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळावयाचा बैठा खेळ आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जाणारे बुद्धिबळ हे पाश्चिमात्य बुद्धिबळ म्हणून ओळखले जाते.
बुद्धिबळ सध्या जगातील सर्वांत प्रसिद्ध बैठ्या खेळांपैकी एक आहे. जगभरात अदमासे ६० कोटी हौशी किंवा व्यावसायिक लोक क्लबमध्ये, पत्राने, आंतरजालावर व विविध स्पर्धांमधून बुद्धिबळ खेळतात. बुद्धिबळात कला आणि शास्त्र यांचा मिलाफ झालेला दिसतो.
बुद्धिबळ एका चौरस पटावर खेळला जातो. या ८x८ च्या पटावर ६४ घरे असतात व ती आलटून पालटून क्रमाने काळ्या-पांढऱ्या रंगाची असतात. पहिला खेळाडू पांढऱ्या तर दुसरा काळ्या सोंगट्यांनी खेळतो. या सोंगट्यांना मोहरे म्हणतात. प्रत्येक खेळाडूचे एका रंगाचे सोळा मोहरे असतात.:- एक राजा, एक राणी(इंग्रजीत क्वीन), दोन हत्ती(इंग्रजीत रूक), दोन घोडे(इंग्रजीत नाइट-सरदार), दोन उंट(इंग्रजीत बिशप) आणि आठ प्यादी(पॉन). प्रतिस्पर्ध्याच्या राजाला शह, म्हणजे मृत्यूचा धाक देऊन मात करणे(हरवणे) हा खेळाचा उद्देश असतो. राजाला शह मिळाल्यानंतर कुठलीही खेळी करून जेव्हा त्याला शहातून बाहेर पडता येत नाही त्यावेळी राजावर मात झाली असे मानले जाते. विचारवंतांनी बराच अभ्यास करून मात करण्यासाठी विविध क्रमांच्या चालींच्या खेळी रचल्या आहेत.
स्पर्धात्मक बुद्धिबळाची परंपरा १६ व्या शतकात युरोपमध्ये सुरू झाली. इ.स. १८८६ साली विल्हेल्म स्टेइनिट्झ हा पहिला अधिकृत बुद्धिबळ विश्वविजेता झाला. विश्वनाथन आनंद हा भारतीय खेळाडू २०१२सालापर्यंत जगज्जेता होता. बुद्धिबळाच्या सांघिक स्पर्धा "बुद्धिबळ ऑलिंपियाड" दर दोन वर्षांतून एकदा भरवल्या जातात. दोन आंतरराष्ट्रीय संघटना-- फेडेरेशन इंटरनॅशनाले देस इचेक्स (फिडे) आणि इंटरनॅशनल करस्पॉंडन्स चेस फेडेरेशन या जगातील महत्त्वाच्या स्पर्धा भरवतात.
बुद्धिबळ खेळणाऱ्या संगणकाच्या निर्मितीसाठी संगणकतज्ज्ञ पहिल्यापासून प्रयत्नशील होते. त्यामुळेच अलीकडील बुद्धिबळावर संगणकाचा प्रभाव पडलेला दिसतो. इ.स. १९९७ मध्ये गॅरी कास्पारोव्ह (त्यावेळचा जगज्जेता) आणि आय.बी.एम. कंपनीचा डीप ब्ल्यू संगणक यांच्यातील सामन्यातून सर्वांत बुद्धिमान/कुशल माणसाला बुद्धिबळात हरवणारी संगणक-प्रणाली तयार करता येते हे सिद्ध झाले.
बुद्धिबळ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.