नैसर्गिक कायदा : ज्या तत्त्वाने माणसाचे भौतिक तसेच पारलौकिक जीवनाचे नियमन होते, ज्याची प्रेरणा ईश्वरी असते किंवा निदान मानवी शक्तीपलीकडची असते आणि ज्याचा आधार सत्य, नीती आणि ज्ञान हे असतात, त्या तत्त्वाला व त्यापासून उगम पावणाऱ्या नियमांना ‘नैसर्गिक कायदा’ असे म्हणतात. नैसर्गिक कायदा हा भौतिक व मानवी कायद्यांचा आदर्श असतो. नैसर्गिक कायद्याची संकल्पना पुनःपुन्हा मांडली गेली आहे. काळाप्रमाणे ती बदलली परंतु गेली २,५०० वर्षे माणसाने संपूर्ण न्याय ह्या ध्येयाचा जो पाठपुरावा केला, त्याची ती मुख्य प्रेरणा होती व आहे. बदलत्या सामाजिक व राजकीय संदर्भांबरोबर नैसर्गिक कायद्याचा आशय बदलला असला, तरी त्याचे सूत्र कायम राहिले. ते सूत्र म्हणजे आदर्श तत्त्वे आणि संपूर्ण न्याय. या सूत्रानुसार प्रचलित विधी किंवा कायद्यांची प्रमाणता ठरविण्यात येते, तसेच अन्यायी कायद्याविरुद्ध व जुलमी सत्तेविरुद्ध विद्रोहही करण्यात येतो.
नैसर्गिक कायदा ही संकल्पना ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी मांडली. निसर्ग हा ह्या तत्त्वज्ञानाचा पाया होता. माणसाने निसर्गाप्रमाणे वागणे, निसर्गाच्या नियमांचे पालन करणे म्हणजेच नैसर्गिक कायद्याप्रमाणे जगणे होय, असे सॉफिस्ट तत्त्वज्ञ मानत. निसर्ग म्हणजेच बुद्धिप्रामाण्य. एका शतकानंतर स्टोइक तत्त्वज्ञान्यांनी ह्यात मोलाची भर घातली. ह्यांत सॉक्रेटीस, प्लेटो व ॲरिस्टॉटल हे महत्त्वाचे. माणूस हा निसर्गाची निर्मिती आहे आणि म्हणून निसर्गच त्याच्या व्यवहारांचे नियमन करतो हे खरे परंतु माणूस हा एकच प्राणी असा आहे की, ज्यास बुद्धी आहे व म्हणून तो आपले निर्णय बुद्धिप्रामाण्यावर घेऊ शकतो. ॲरिस्टॉटलच्या ह्या तत्त्वज्ञानाचा परिणाम पुढील तत्त्वज्ञांवर झाला. कांट, हेगेल, केलझेन, व्हेक्क्यिओ, श्टामलर, येरिंग व मिल या सर्वांनी आपले सिद्धांत सॉक्रेटीसच्या वरील सिद्धांतावरच आधारले. ह्यापूर्वी नैसर्गिक कायदा म्हणजे केवळ सर्व प्राणिमात्रांना लागू होणारा व सर्वांना समान लेखणारा कायदा एवढाच अर्थ होता. स्टोइक तत्त्वज्ञानाच्या प्रतिपादनाने माणूस हा बुद्धीने चालणारा असल्याने तो चांगले व वाईट, नीती व अनीती ह्यांत भेद करू शकतो, म्हणून त्याने बुद्धिप्रामाण्यावर मान्य केलेला कायदा म्हणजे नैसर्गिक कायदा ही संकल्पना रूढ झाली. मध्ययुगीन काळात नैसर्गिक कायदा आणि धर्म ह्यांची एकत्र गुंफण झाली. ईश्वराच्या प्रेमाला पारख्या झालेल्या माणसालाच मानवनिर्मित कायद्याची गरज लागते. हे कायदे चांगले असूच शकत नाहीत परंतु धर्मसत्ता ते राबविताना ख्रिस्ती तत्त्वांशी जास्तीत जास्त सुसंगत होतील, अशी दक्षता घेते. म्हणून सर्व सत्ता धर्मसत्तेतच केंद्रित करायला हवी. धर्मसत्तेचे काम भूतलावर शांतता राखणे हे होय. बाराव्या शतकापासून हे तत्त्वज्ञान मांडले गेले.
प्रबोधनकाळ व धर्मसुधारणा आंदोलन ह्यांच्यानंतर चर्चच्या सत्तेस पायबंद बसला व धर्म आणि शासन ह्यांची एकमेकांपासून फारकत झाली. ह्यानंतर नैसर्गिक कायद्याची इहवादी कल्पना पुढे आली, तीत ह्यूगो ग्रोशिअसचा वाटा फार मोठा होता त्याचा मूलाधार सॉक्रेटीसच होता. माणसाला समाजात राहावयाचे असते आणि त्याकरिता इतर माणसांशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक असते. ह्या इच्छेतून व त्याच्या बुद्धीमुळे तो आपल्या सर्व व्यवहारांचे जे नियमन करतो, तो नैसर्गिक कायदा होय. ग्रोशिअसला आंतरराष्ट्रीय कायद्याचा जनक म्हणतात. पूफेनडोर्फ, फाटेल इ. याच मतप्रणालीचे होते. ग्रोशिअसने शासनाबाबत सामाजिक कराराचा सिद्धांत मांडला. त्या सिद्धांताप्रमाणे लोक आपले सरकार निवडतात आणि त्या सरकारशी आज्ञापालनाचा करार करतात. सरकारने केलेले कायदे व्यक्तीवर बंधनकारक असतात. हॉब्जने (१५८८–१६७९) ह्यावर भाष्य करताना व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचा उच्चार केला. मात्र हॉब्जच्या मते, सार्वभौम सत्ता अमर्यादित आणि निरंकुश असते. लॉक (१६३२–१७०४) आणि रूसो (१७१८–८८) ह्यांनी आपले सिद्धांत मांडताना व्यक्ती आणि राजसत्ता यांतील संबंधांचा जास्त ऊहापोह केला.
लॉकच्या सिद्धांतावरच अमेरिकन राज्यघटनेची उभारणी झाली. त्या घटनेत जनतेचे मूलभूत अधिकार राखून ठेवण्यात आलेले आहेत. शासनाला ते हिरावून घेता येणार नाहीत. अमेरिकन राज्यघटनेचा अन्ययार्थ लावताना नैसर्गिक कायदा ह्या संकल्पनेचा उपयोग अमेरिकन न्यायाधीशांनी फार मोठ्या प्रमाणावर केला आहे. भारतातही नैसर्गिक न्याय संकल्पना सर्वोच्च न्यायालयांनी वापरल्याचे दिसते. (उदा., केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य खटल्यात संविधानाची सारभूत अंगे घटनादुरुस्ती करून नष्ट करता येणार नाहीत, असा निर्णय दिलेला आहे).
नैसर्गिक कायद्याची संकल्पना अनेक कारणांसाठी उपयोगी पडलेली आहे. त्याने कायद्याच्या आधुनिकीकरणाला चालना मिळते, व्यक्तीच्या स्वातंत्र्याला संरक्षण मिळते आणि आंतरराष्ट्रीय कायद्याची महती वाढते. त्याची भूमिका मुख्यतः मानवतावादी आहे.
नैसर्गिक कायदा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!