विल्हेमिना तथा विल्हेमिना हेलेना पॉलीन मरिया (३१ ऑगस्ट, १८८० - २८ नोव्हेंबर, १९६२) ही १८९० पासून १९४८ पर्यंत नेदरलँड्सची राणी होती. तिने वयाच्या १०व्या वर्षापासून पदत्याग करे पर्यंत जवळजवळ ५८ वर्षे राज्य केले. ती डच इतिहासातील सर्वात जास्त काळ राज्य करणारी राज्यकर्ती होती. विल्हेमिना युनायटेड किंग्डम सोडून सर्वाधिक राज्य करणारी राणी होती. पहिले महायुद्ध, १९३३ चे डच आर्थिक संकट आणि दुसरे महायुद्ध तिच्या कारकिर्दीत घडले.
विल्हेमिना दुसरा विल्हेम त्याची राणी पिमाँत आणि वाल्डेकची एम्मा यांचे जगलेले एकमेव अपत्य होती. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर विल्हेमिना राणी झाली. तिच्या आईने त्यावेळी कारभार सांभाळला. मुखत्यार झाल्यानंतर तिने पहिल्या महायुद्धात तटस्थता स्वीकारल्याने तसेच देशातील अनेक औद्योगिक प्रश्न मिटवल्याने ती नेदरलँड्समध्ये लोकप्रिय झाली. तिने आपल्या उद्योगधंद्यातून प्रचंड पैसा कमावला व १ अब्ज अमेरिकन डॉलर असलेली ती पहिली स्त्री झाली.
१९४० मध्ये नेदरलँड्सवरील जर्मन आक्रमणानंतर विल्हेमिना पळून ब्रिटनला गेली आणि तेथील परागंदा डच सरकारच्या नेतेपदी बसली. ब्रिटनमधून ती अनेकदा रेडियोवरून नेदरलँड्सला संबोधित करीत असे. विल्हेमिनाला डच प्रतिकाराचे प्रतीक म्हणून ओळखले जाऊ लागले. १९४८ च्या सुमारास नेदरलँड्समध्ये परतली. तिच्या राज्याभिषेकाच्या वेळी सत्तेवर असलेल्या १७ युरोपीय राज्यकर्त्यांपैकी त्यावेळी ती एकटी उरली होती. ढासळत असलेल्या तब्येतीमुळे विल्हेमिनाने सप्टेंबर १९४८ मध्ये पदत्याग करून आपली मुलगी ज्युलियानाला राणीपद दिले. निवृत्तीनंतर ती हेट लू महालात राहत असे. १९६२ मध्ये तेथेच तिचे निधन झाले.
नेदरलँड्सची पहिली विल्हेमिना
या विषयावर तज्ञ बना.