नखे ज्या पृष्ठवंशी (पाठीचा कणा असणाऱ्या) प्राण्यांच्या हातापायांना बोटे असतात त्या प्राण्यांच्या बोटांची टोके केराटिनीकृत (तंतुमय प्रथिनांनी युक्त), कठीण अध्यावरणीय (त्वचेच्या) संरचनांनी मजबूत झालेली असतात. या संरचना नखर (नख्या), नखे अथवा खूर या स्वरूपाच्या असतात. उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे) प्राणी मात्र याला अपवाद आहेत. उभयचरांमध्ये जरी खरे नखर नसले, तरी त्यांच्या हातापायांच्या बोटांच्या टोकांवर बाह्यत्वचेच्या शृंगी (शिंगाच्या द्रव्याच्या) स्तराचे स्थूलन (जाड झालेला भाग) असते. ही स्थूलने पृष्ठवंशी श्रेणीमध्ये पुढे उत्पन्न होणाऱ्या नखरांची सूचक होत, असे मानावयास हरकत नाही. आफ्रिकेतील झेनोपस भेक व जपानी सॅलॅमँडर ऑनिकॉडॅक्टिलस या उभयचरांत ही बाह्यत्वचेची स्थूलने काही बोटांवर प्रत्यक्ष नखरांचे रूप धारण करतात.
सरीसृप (सरपटणारे प्राणी) व पक्षी या दोन्ही वर्गांतील प्राण्यांच्या बोटांवर फक्त नखर असतात पण स्तनिवर्गात नखर असून त्यांच्या भरीला खूर आणि नखेदेखील असतात. नखर हे सरीसृपांकडून वारसा म्हणून सस्तन प्राण्याकडे आलेले आहेत आणि ह्या प्राण्यांनी आवश्यकतेप्रमाणे त्यांचे परिवर्तन करून खूर व नखे उत्पन्न केली आहेत. यामुळे सस्तन प्राण्यांत नखर, खूर आणि नखे असे तिन्ही प्रकार आढळतात (खूर व नखर यांची माहिती ‘खूर आणि नखर’ या स्वतंत्र नोंदीत दिलेली आहे.)
स्तनिवर्गांत माणूस व नरवानर (प्रायमेट्स) गणातील इतर प्राणी यांना नखे असतात. ती बोटांच्या संवेदी उपवर्हाला (उशी सारख्या भागाला, पॅडला) मजबुती आणून त्याचे संरक्षण करतात. नख चापट पट्टिकेसारखे असून त्याने बोटाच्या टोकाचे वरचे पृष्ठ झाकलेले असते. ते एके ठिकाणी घट्ट बांधलेल्या अतिशय शृंगित (केराटिनीभवन झालेल्या) उपकला-कोशिकांचे (त्वचेच्या वरच्या भागात असलेल्या कोशिकांचे—पेशींचे) बनलेले असते. या कोशिका मूळ मालपीगी कोशिकांपासून (एम्. मालपीगी या इटालियन शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या कोशिकांपासून) उत्पन्न झालेल्या असल्या, तरी निर्जीव झालेल्या असतात. नखपट्टिकेच्या समीपस्थ (जवळच्या टोकाशी नखाचे मूळ असून ते आधारद्रव्याच्या जाड थराचे बनलेले असते. या आधारद्रव्यापासून नखाची एकसारखी वाढ होते. नखपट्टिकेच्या बुडाशी जी अर्धचंद्राकृती पांढरी जागा दिसते त्या जागी नखाच्या खाली हे आधारद्रव्य असते. या पांढऱ्या अर्धचंद्राकृती जागेला चंद्रक म्हणतात.
चंद्रक वगळून बाकीच्या नखाचा रंग गुलाबी दिसतो, पण हा त्याचा रंग नव्हे. नख अर्धपारदर्शक असल्यामुळे नखाच्या खाली असणाऱ्या केशवाहिन्यांतील रक्ताचा रंग त्यामधून गुलाबी दिसतो. चंद्रकाचा रंग पांढरा दिसतो याचे कारण आधारद्रव्याचा थर जाड असल्यामुळे त्यातून रक्ताचा रंग दिसत नाही. नख जोराने दाबले, तर त्याच्या खाली असणाऱ्या केशवाहिन्यांतील रक्त निघून जाते आणि सबंध नख पांढरे दिसते. कधीकधी नखात काही काळ टिकणारे पांढरे ठिपके दिसून येतात. शृंगी स्तराच्या कोशिकांमध्ये आकस्मिकपणे अडकलेल्या हवेच्या त्या जागा असतात.
सबंध नख बाह्यत्वचेच्या वरच्या शृंगी स्तरातून बाहेर आलेले असल्यामुळे त्या स्तराचा काठ खरबरीत व फाटका असतो, त्याला अधिनख म्हणतात. त्याने चंद्रकावर थोडे अतिक्रमण केलेले असून नखाच्या (अंग्विस) दोन्ही कडांनाही ते चिकटलेले असते. नखाच्या मोकळ्या अग्र काठाखाली सबअंग्विसचा शिल्लक राहिलेला भाग दिसून येतो.
माणसाच्या नखाची वाढ स्थूलमानाने सहा महिन्यांत २·५ सेंमी. होते. माणसाने आपली नखे केव्हाही कापली नाहीत किंवा ती तुटली नाहीत, तर त्याच्या वयाच्या सत्तराव्या वर्षी तत्त्वतः ती सु. ३०५ सेंमी. किंवा अधिक लांब होतील.
माणसाचा गर्भ नऊ आठवड्यांचा झाल्यावर त्याच्या बोटांवर उभयचरांच्या बोटांवर असलेल्या स्थूलनांसारखी बाह्यत्वचीय स्थूलने उत्पन्न होतात. बाराव्या आठवड्यात नखे तयार होतात पण ती त्यांच्या ठराविक जागी (बोटाच्या टोकांचे बरचे पृष्ठ) येण्यास बराच काळ लागतो.
बहुतेक सस्तन प्राण्यांचे नखर पार्श्व बाजूंनी दबलेले असतात आणि त्यांच्यापासूनच परिवर्तनाने नरवानर गणातील प्राण्यांची नखे उत्पन्न झालेली असतात. काही लेमूरांमध्ये हे स्थित्यंतर स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या काही बोटांवर नखर असतात, तर काही बोटांबर गोल नखे असतात.
नख
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.