दीर्घकालीक मूत्रपिंड रोग

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

दीर्घकालीक मूत्रपिंड रोग

दीर्घकालीन मूत्रपिंड रोग (इंग्लिश: Chronic Kidney Disease) (सिकेडी) हा मूत्रपिंडाचा दीर्घकालीन आजार आहे, ज्यामध्ये काही वर्षांच्या कालावधीत मूत्रपिंडाची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. सुरुवातीला, हे केवळ जैवरासायनिक विकृती म्हणून प्रकट होते, परंतु कालांतराने मूत्रपिंडाची उत्सर्जन, चयापचय व अंतःस्रावी कार्ये बंद होऊ लागल्यावर मूत्रपिंड निकामीपणाची लक्षणे दिसू लागतात, ज्याला एकत्रितपणे युरेमिया म्हणतात.याला अंतिम-अवस्था मूत्रपिंड रोग किन्वा (५वी अवस्था) म्हणतात्,जेव्हा मूत्रपिंड प्रत्यारोपण शिवाय मृत्यू अटळ असतो सुरुवातीला कोणतीही लक्षणे नसली तरी नंतर दिसणारी लक्षणे म्हणजे पाय सुजणे, थकवा येणे, उलटी होणे, भूक न लागणे व गोंधळ. मूत्रपिंडाच्या संप्रेरक कार्यात व्यत्यय आल्याशी संबंधित गुंतागुंत म्हणजे उच्च रक्तदाब (बहुधा रेनिन-अँजिओटेन्सिन प्रणाली सक्रिय होण्याशी संबंधित), अशक्तपणा व रेनल ऑस्टिओडिस्ट्रॉफी. याशिवाय सीकेडी रुग्णांमध्ये हृदय-रक्तवाहिन्यासंबंधी (कार्डिओव्हॅस्क्युलर) गुंतागुंत खूप अधिक असते आणि यामुळे मृत्यू व रुग्णालयात दाखल होण्याचा धोकाही वाढतो. दीर्घकालीन मूत्रपिंड रोगाची कारणे म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस व पॉलिसिस्टिक किडनी रोग. या रोगाचा कौटुंबिक इतिहास असल्यास हा रोग होण्याचा धोका खूप वाढतो. रोगनिदानासाठी रक्त तपासणी करून अंदाजित ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट (eGFR) निश्चित करणे व मूत्र तपासणी करून अल्ब्युमिन मोजणे आवश्यक आहे. अंतर्निहित कारण शोधण्यासाठी मूत्रपिंड अल्ट्रासोनोग्राफी| व मूत्रपिंड ऊतक परीक्षा केली जाऊ शकते. रोग कोणत्या अवस्थेत आहे हे निश्चित करण्यासाठी रोगाच्या तीव्रतेच्या आधारे अनेक अवस्था-वर्गीकरण पद्धती आहेत.

धोक्यात असलेल्या व्यक्तींची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या उपचारांमध्ये उच्च रक्तदाब, रक्तातील ग्लुकोज व कोलेस्टेरॉल कमी करण्याची औषधे घेणे समाविष्ट आहे. रक्तदाब कमी करण्यासाठी वापरली जाणारी प्रथम श्रेणीची औषधे म्हणजे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनहिबिटर,उदाहरणार्थ, लिसिनोप्रिल किंवा अँजिओटेन्सिन II रिसेप्टर ब्लॉकर, उदाहरणार्थ, टेल्मिसार्टन, कारण ही औषधे मूत्रपिंड रोगाची प्रगती मंद करतात व हृदयरोगाचा धोका कमी करतात.लूप मूत्रवर्धक औषध (लूप डायुरेटिक) सूज नियंत्रणात व आवश्यक असल्यास अधिक रक्तदाब कमी करण्यासाठी वापरले जाते. एनएसएआयडी औषधे, उदाहरणार्थ,आयबुप्रोफेन घेणे टाळावे. इतर शिफारस केलेल्या उपायांमध्ये सक्रिय राहणे, काही आहारविषयक बदल जसे की कमी मीठ खाणे व मर्यादित प्रथिने घेणे यांचा समावेश आहे. अशक्तपणा व हाडांच्या आजारांसाठी उपचार लागू शकतो. गंभीर स्थितीत रक्त अपोहन (हेमोडायलिसिस),उदरावरणीय अपोहन (पेरिटोनियल डायलिसिस) किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण आवश्यक होते.

२०१९ मध्ये जगभरात सुमारे ८५ कोटींहून अधिक लोक दीर्घकालीन मूत्रपिंड रोगाने ग्रस्त होते, २०१६ मध्ये हा आकडा ७५ कोटी ३० लाख होता (त्यापैकी ४१ कोटी ७० लाख महिला व ३३ कोटी ६० लाख पुरुष). २०१५ मध्ये सुमारे १२ लाख लोक या रोगाने मरण पावले, १९९० मध्ये हा आकडा ४ लाख ९० हजार होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →