चंद्रगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
सह्याद्रीतल्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले. त्यापैकी "चंद्रगड उर्फ ढवळगड उर्फ गहनगड" जावळीच्या खोऱ्यातील एका उंच पहाडावर बांधण्यात आला. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगळगड, चंद्रगड, प्रतापगड, कावळा किल्ला व पारघाटाचे प्रचंड पहाड यांच्या दाटीत जावळीच खोर वसलेल आहे. हा भाग उंच पहाड, घनदाट जंगल व खोल दऱ्यांनी नटलेला आहे. या जावळीच्या खोऱ्यावर मोरे घराण्याने पिढ्यान पिढ्या राज्य केल त्यांना ‘‘चंद्रराव’’ हा किताब मिळाला होता. त्यावरूनच या किल्ल्याचे नाव चंद्रगड ठेवले असावे.
महाबळेश्वरी ऊगम पावणारी सावित्री नदी अरबी समुद्राला बाणकोट जवळ मिळते. प्राचीन काळा पासून महाड गावातून वाहाणाऱ्या सावत्री नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (वरंधा, आंबेनळी, पार घाट, मढ्या घाट, ढवळ्या घाट इत्यादी) घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. त्यापैकी वरंधा घाट (महाड ते भोर) व आंबेनळी घाट (पोलादपूर ते महाबळेश्वर) यामार्गांवर रस्ते बनवल्यामुळे आजही वापरात आहेत. या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. सावित्री नदीच्या (खाडीच्या) मुखावर असलेला बाणकोटचा किल्ला, घाटमार्गाचे रक्षण करणारा कावळा, चंद्रगड, मंगळगड, प्रतापगड इत्यादी किल्ले आणि घाटमाथ्यावर असणारे कमळ, केंजळ इत्यादी किल्ले अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. या घाटवाटांपैकी पोलादपूरहून महाबळेश्वरच्या आर्थरसीटला (मढीमहाल) जाणाऱ्या "ढवळ्या घाटावर" नजर ठेवण्यासाठी चंद्रगडाची निर्मिती करण्यात आली होती.
चंद्रगड ते आर्थरसीट पॉईंट (मढी महल) हा सुद्धा प्राचीन ढवळे घाटमार्ग होता. चंद्रगड किल्ला, बहिरीची घुमटी, जोरचे पाणी हे प्राचीन अवशेष याची साक्ष देत आजही उभे आहेत. चंद्रगड ते आर्थरसीट पॉईंट (मढी महल) हा सह्याद्रीतील अतिकठीण ट्रेकपैकी एक आहे. या ट्रेक मध्ये कुठेही रोप लावून चढावे लागत नाही, तरीही आपण समुद्रसपाटी पासून (४७२१ फूट उंच) महाबळेश्वर पर्यंत एका दिवसात चढून जातो. त्यामुळे हा ट्रेक शरीराची व मनाची कसोटी पाहाणारा आहे.
चंद्रगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
चंद्रगड
थोडक्यात पण महत्त्वाचे.