खोडमाशी ( शास्त्रीय नाव:Melanagromyza Sojae , ( मेलॅंनाग्रोमायझा सोजे ); कुळ: Agromyzidae;) ही माशी आकाराने लहान, चमकदार काळ्या रंगाची असते. तिच्या उदराजवळ किंचित चमकदार काळपट हिरवा रंग असून, पाय, स्पर्शिका व पंखांच्या शिरा फिकट तपकिरी रंगाच्या असतात. पंखांची लांबी २ ते २.४ मि.मी असते. ही पानांमध्ये वरील बाजूस पांढऱ्या रंगाची किंचित लंबगोलाकार अंडी घालते. त्यातून दोन-चार दिवसांनी पिवळ्या रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. खोडमाशीची अळी ही अवस्था वनस्पतींस व पिकांस हानिकारक असते. ही अळी पानांच्या शिरांतून देठ आणि मग खोडामध्ये प्रवेश करून ते खाऊन पोकळ बनवते. प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यावर पूर्ण झाड वाळून जाते. मोठ्या झाडावर या किडीचा प्रादुर्भाव वरून जाणवत नाही पण झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. फुले व शेंगा कमी लागतात परिणामी मोठ्या प्रमाणात पिकांच्या उत्पन्नात घट होते. खोडामध्ये असतानाच ही अळी कोषावस्थेत जाते व ५ ते १९ दिवसांनी कोषातून प्रौढ माशी होऊन खोडाला छिद्र पाडून बाहेर पडते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खोडमाशी
यामागील विज्ञान आणि इतिहास.