कॅटेरिना वासिलिव्हना बिलोकुर (७ डिसेंबर (२४ नोव्हेंबर) १९०० – ९ जून १९६१) या पोल्टावा गव्हर्नरेटमध्ये जन्मलेल्या एक युक्रेनियन लोककलाकार, चित्रकार आणि कवयित्री होत्या. सुरुवातीला फारशी चांगली कामगिरी न केल्यानंतर, १९३० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९४० च्या दशकात निसर्गावरील त्यांच्या आवडीमुळे त्यांची कामे ओळखली जाऊ लागली. युक्रेनियन स्त्रियांच्या शेतकरी जीवनाच्या चित्रणासाठी त्यांची चित्रे प्रसिद्ध झाली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कॅनव्हासवर तेलाच्या रंगात रंगवलेल्या बिलोकुर यांच्या फुलांच्या चित्रांमुळे त्यांना सर्वसाधारण ओळख मिळाली, समीक्षकांनी नमूद केले की जणू, ती "फुलांचे आत्मे बघू शकते."
१९५१ मध्ये बिलोकुर यांना युक्रेनच्या 'पीपल्स आर्टिस्ट' म्हणून गौरविण्यात आले. अनेक स्रोतांनुसार एक लोकप्रिय आख्यायिका आहे की पाब्लो पिकासो यांनी पॅरिसमध्ये बिलोकुर यांचे काम पाहिले आणि टिप्पणी केली, "[जर] आपल्याकडे या पातळीची कलाकार असती, तर आपण संपूर्ण जगाला तिच्याबद्दल बोलायला लावले असते."
बिलोकुरचा जन्म २४ नोव्हेंबर (७ डिसेंबर), १९०० रोजी बोहदानिव्हका या गावात झाला होता. वयाच्या सहाव्या किंवा सातव्या वर्षी बिलोकूर वाचायला शिकली. बूट आणि कपड्यांवरील खर्च वाचवण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी तिला शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला. तिने लहानपणापासूनच चित्रकला सुरू केली, पण तिच्या आई-वडिलांना हा छंद आवडत नसे आणि ते तिला तसे करू देत नसत. बिलोकूर जुने कपडे आणि कोळसा वापरून गुपचूप चित्रकला करत राहिली.
एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगीतले की त्यांनी त्यांच्या आईकडून एकदा पांढऱ्या कॅनव्हासचा एक तुकडा घेतला आणि कोळशाचा एक तुकडा घेतला. त्यांनी एका बाजूला काहीतरी काढते, मग त्याचा आनंद घेते दुसऱ्या बाजूला काहीतरी काढते. एकदा त्यांनी जे पाहिले नाही असे काहीतरी काढले, जे त्यांनी कल्पना केलेले काही पक्षी होते. त्या जे काही तयार करू शकले त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. तेव्हाच त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना पकडले. त्यांनी चित्र फाडून टाकले आणि जाळून दिले. "तू वेडी झाली आहेस का? तू काय करत आहेस? जर इतर लोकांनी तुला हे करताना पाहिले तर काय होईल? यानंतर कोणता सैतान तुझ्याशी लग्न करायला तयार होईल!.." असे तिचे पालक बोलले. त्या पुढे बोलल्या, "मला निसर्गाचा राग येतो, तो माझ्याशी क्रूरपणे वागला, त्याने मला पवित्र चित्रकलेचे हे प्रचंड प्रेम दिले आणि मग माझ्या प्रतिभेच्या पूर्ण क्षमतेने हे अद्भुत कार्य निर्माण करण्याची संधी हिरावून घेतली!"
ती तिच्या शेजारीण आणि दूरच्या नातेवाईक, निकिता टोनकोनोग यांनी आयोजित केलेल्या स्थानिक नाट्य क्लबसाठी सजावटीची चित्रे काढायची. नंतर, बिलोकूर याच नाट्यगृहाच्या रंगमंचावर अभिनय सादर करायची.
१९२२ ते १९२३ च्या दरम्यान, बिलोकूरला मिरहोरॉड येथील कलात्मक सिरॅमिक्सच्या व्यावसायिक शाळेबद्दल समजले. तिने स्वतःची दोन रेखाचित्रे निवडली आणि ती मिरहोरॉडला गेली: एक चित्राची प्रतिकृती होती आणि दुसरे तिच्या आजोबांच्या घराचे रेखाचित्र होते; ही दोन्ही रेखाचित्रे तिने खास या प्रसंगासाठी विकत घेतलेल्या कागदावर काढली होती. पण तिचे कोणतेही औपचारिक शिक्षण झाले नसल्यामुळे तिला शाळेत प्रवेश मिळाला नाही व ती घरी परतली.
चित्र काढण्याची इच्छा तिच्या मनात कायम होती. पुढे, तिने कलिता नावाच्या दोन विवाहित शिक्षकांनी आयोजित केलेल्या नाट्यवर्गात जायला सुरुवात केली.
तिच्या आईवडिलांनी तिला नाटकांमध्ये भाग घेण्यास परवानगी दिली, पण अट अशी होती की तिच्या अभिनयामुळे तिच्या घरकामात अडथळा येऊ नये. १९२८ मध्ये, बिलोकूरने क्यीवमधील एका नाट्यशाळेबद्दल ऐकले आणि तिथे आपले नशीब आजमावण्याचे ठरवले. पण पुन्हा एकदा, पूर्वशिक्षणाच्या अभावामुळे तिला नाकारण्यात आले.
१९३४ च्या शरद ऋतूमध्ये, तिने चुमगाक नदीत बुडून आत्महत्येचा प्रयत्न केला आणि थंडीमुळे तिच्या पायांना इजा झाली. आत्महत्येच्या प्रयत्नानंतर, तिच्या वडिलांनी अखेरीस तिला चित्रकला करण्याची परवानगी दिली.
कॅटेरिना बिलोकुर
या विषयातील रहस्ये उलगडा.