पॅसिफ्लोरा "सोइ फा" (जांभळे कृष्णकमळ) हे भारतात आढळणाऱ्या कृष्णकमळांच्या (कुळ-पॅसिफ्लोरेसी) अनेक जातींमधले सर्वात प्रसिद्ध फुल आहे. ह्या वेलसदृश्य वनस्पतीचं कूळ प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेतील असूनही, दक्षिण आशियाई देशातील (उदा. थायलंड, मलेशिया) आणि भारतीय उपखंडातील उष्णकटिबंधीय हवामानात ती पूर्णतः रुळली आहे. ही एक संकरित (हायब्रिड) जातीची वनस्पती असून त्याला स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते.
खोड: लहान वेलीचे खोड हिरवे व नाजूक असून एकदा वाढल्यानंतर जोर धरत जाते व लाकडासारखे (कमाल इंचभर जाड) होत जाते. खोडातून फुटणारे लतातंतू पानांच्या देठाच्या उगमस्थानापासून निघतात आणि वेलीला आधार देण्याचे काम करतात. सुरुवातील जमिनीलगत वाढणारी वेल मांडवावर चढवल्यास १५ फुटापर्यंत उंच वाढते व मुळांपासून फुटणाऱ्या तणावांतून (स्टोलोन्स) पसरत जाते.
पाने: "सोइ फा" वेलीची पाने साधी, एकाआड एक, हाताच्या पंजासारखी, तीन कंगोरे असलेली त्रिकोणी असतात. पानांच्या देठावर दोन पर्णग्रंथी (Petiole) असतात. पानांची कड हलकी करवती प्रकारची असते.
फुले: जून ते सप्टेंबर ह्या पावसाळी मोसमात वेलीची वाढ जोमाने होते व त्याला फुले धरतात. "सोइ फा"ची फुले सकाळच्या कोवळ्या उन्हात उमलू लागतात आणि सूर्यास्तापर्यंत मिटून मलूल होऊन जातात. "सोइ फा" कृष्णकमळाची फुले द्विलिंगी, जांभळ्या-पांढऱ्या रंगाची असून त्यांना मंद सुगंध येतो, मात्र ह्या संकरित वेलीला नैसर्गिकरित्या परागीभवनातून फळे धरत नाहीत. प्रत्येका फुलास पाच सुटी प्रदले आणि पाच संदले (हिरवी-फिकट जांभळी), त्यांच्या आतील बाजूस अनेक (अंदाजे ७२-७३) तंतूंचे प्रभामंडल (कोरोना) असते. हे तंतू दोन वेगवेगळ्या वर्तुळांनी बनलेले असून बाहेरील वर्तुळातील तंतू उंच व आतील किंचित लहान असतात. त्यावर बुंध्याशी जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाचे आळीपाळीने दोन पट्टे असतात आणि उर्वरित जांभळा भाग टोकाशी नागमोडी असतो. पाच केसरदलांच्या खाली जुळून झालेल्या नलिकेतून (केसरधरातून) किंजधर वर येतो आणि त्यावर किंजमंडल असते. परागकोश विलोल, किंजपुट ऊर्ध्वस्थ, किंजले तीन व किंजल्क टोपीसारखे असते. बीजके पिवळी, अनेक व तटलग्न असतात.
फुलांच्या निळ्या-जांभळ्या रंगामुळे, प्रभामंडळामुळे आणि वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे ह्या फुलांना "कृष्णकमळ" किंवा "कौरव-पांडव" फुल, तसेच उत्तर भारतात "राखी" फूल किंवा "झुमका लता" (कर्णफुलांची वेल) असेही म्हणतात. भोवतालचे तंतू म्हणजे १०० कौरव, त्यातील ५ पुंकेसरदले म्हणजे पाच पांडव, मधील गुलाबी बीजांडकोश म्हणजे द्रौपदी आणि मध्यभागी असलेली ३ किंजले म्हणजे भगवान कृष्णांचे सुदर्शन चक्र किंवा ब्रम्हा-विष्णू-महेश हे त्रिदेव मानले जातात.
कृष्णकमळ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?