एरबस ए३४० (इंग्लिश: Airbus A340) मोठ्या प्रवासीक्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. चार इंजिने असलेले हे विमान २६१ ते ३८० प्रवाशांना ६,७०० ते ९,००० मैल (१०,८०० - १४,६०० कि.मी)पर्यंत नेऊ शकते. या विमानाची रचना एरबस ए-३३० या विमानासारखी आहे.
ए ३४० चे लांबीनुसार चार उपप्रकार आहेत. ए ३४०-३०० हा ५९.३९ मीटर लांबीचा पहिला उपप्रकार इ.स. १९९३पासून तयार केला गेला. -२०० हे त्याहून छोटे विमान आहे. ए ३४०-६०० हा -२०० पेक्षा १५.९१ मीटर जास्त लांबीचा आहे. -५०० हा सगळ्यात मोठा पल्ला असलेला उपप्रकार आहे. -३०० आणि -२०० उपप्रकारांवर वर सीएफएम५६-५सी प्रकारची इंजिने असतात. यांची क्षमता प्रत्येकी १५१ किलोन्यूटन आहे. -५०० आणि -६०० वर रोल्स-रॉइस ट्रेंट ५०० प्रकारची इंजिने असतात. यांची क्षमता २६७ किलोन्यूटन आहे. -२०० व -३००ची बाह्य रचना एरबस ए-३३०सारखीच आहे तर -५०० आणि -६००ला ए३३०पेक्षा मोठे पंख असतात.
लुफ्तांझा आणि एर फ्रान्सने सर्वप्रथम ए३४० विमानांचा वापर मार्च १९९३मध्ये केला. ऑक्टोबर, इ.स. २०१०अखेर ३७९ प्रती विकल्या गेल्या आहेत. पैकी ३७४ विमाने विमानकंपन्यांना देण्यात आली होती आणि पाच तयार होत होती. यांपैकी २१८ विमाने ए३४०-३०० उपप्रकाराची आहेत व लुफ्तांझाकडेच ५९ आहेत. ए३४०ला चार इंजिने असल्यामुळे त्यावर इटॉप्सची बंधने नाहीत व जमिनीपासून अमुक एकच अंतरापर्यंत समुद्रात जाता येण्याची मर्यादा नाही, म्हणून ही विमाने बहुधा महासागरांपलीकडील शहरांत विमानसेवा पुरवण्यासाठी वापरली जातात. अलीकडे विमानइंजिनामध्ये झालेल्या शोधांमुळे त्यांची विश्वसनीयता वाढली आहे व दोन इंजिनांची बोईंग ७७७ सारखी विमानेही इटॉप्स बंधनांपासून मुक्त होत आहेत. यामुळे ए३४०ची लोकप्रियता काही अंशी कमी झाली आहे.
एरबस ए३४०
थोडक्यात पण महत्त्वाचे.