आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८-१९

थोडक्यात पण महत्त्वाचे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८-१९चा हा मोसम सप्टेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ पर्यंत असणार आहे. सध्या या मोसमात एकूण ३५ कसोटी सामने, ८४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने तर ४८ ट्वेंटी२० सामने होणार आहेत. मोसमाच्या सुरुवातीला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत, एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धेत आणि ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे भारत, इंग्लंड व पाकिस्तान अव्वल स्थानावर होते. ऑक्टोबर २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी महिलांसाठी एकदिवसीय व ट्वेंटी२० साठी स्वतंत्र गुणरचना केली. ऑस्ट्रेलिया महिला दोन्ही गुणरचनेत अव्वल आहे.

आशिया चषक पात्रतेनी पुरुषांच्या मोसमाला सुरुवात झाली ज्यात हॉंग कॉंगने अंतिम सामन्यात संयुक्त अरब अमिरातीचा पराभव करून २०१८ आशिया चषकात प्रवेश मिळविला. भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवून आशिया चषक जिंकला. या मोसमात न्यू झीलंडने पाकिस्तानवर तब्बल ४९ वर्षांनी परदेशी कसोटी मालिकेत विजय मिळवला.

२० ऑक्टोबर २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठी नव्या पात्रतेचा ढाचा जाहीर केला. तत्कालीन विश्व क्रिकेट लीगमधील विभाग तीन आणि विभाग दोनच्या समारोपानंतर ही स्पर्धा बाद केली जाईल व त्या जागी सुपर लीग ही स्पर्धा जागा घेईल. सुपर लीगमध्ये पुढील उपस्पर्धा असतील : १) विश्वचषक सुपर लीग (१२ संपूर्ण सदस्य देश व नेदरलँड्स), २) विश्वचषक लीग दोन (स्कॉटलंड, नेपाळ, संयुक्त अरब अमिराती आणि विभाग दोनमधील अव्वल ४ देश), ३) विश्वचषक चॅलेंज लीग (विश्व क्रिकेट लीगमधील खालचे १२ देश), ४) विश्वचषक प्ले-ऑफ आणि २०२२ क्रिकेट विश्वचषक पात्रता. ओमानमध्ये झालेल्या विभाग तीनच्या निकालानंतर ओमान व अमेरिकेची संयुक्त संस्थाने २०१८ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोनकरता पात्र ठरले. तर सिंगापूर, केन्या, डेन्मार्क आणि युगांडा यांची चॅलेंज लीगमध्ये घसरण झाली. विभाग दोन एप्रिल २०१९ मध्ये नामिबियात होणार आहे.

या मोसमातच २०२० आयसीसी ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रतेची सुरुवात झाली. पुर्व आशिया-प्रशांत प्रदेशातून फिलीपाईन्स पुर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरीत पात्र झाला, आशियातून नेपाळ, सिंगापूर आणि मलेशिया आशिया प्रादेशिक अंतिम फेरीत पात्र ठरले. आफ्रिकेतून बोत्स्वाना आणि नामिबिया आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरीत पात्र ठरले तर अमेरिकेतून कॅनडा आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने अमेरिका प्रादेशिक अंतिम फेरीत पात्र ठरले.

भारतीय महिलांच्या श्रीलंका दौऱ्यापासून महिलांच्या मोसमास सुरुवात झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →